राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार राडा

नगरपालिका

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । राज्यात आज मंगळवारी (२ डिसेंबर) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६२ नगराध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ७,३० वाजता या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आजच्या या मतदानामध्ये राज्यातील विविध ठिकाणी जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी बोगस मतदार थेट मतदान केंद्रावर आणण्यात आले. तर काही ठिकाणी दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.

या घटनांमधील पहिला राडा हा बदलापुर येथे घडला. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या ४३ जागांसाठी येथे मतदान होत आहे. बदलापूर पश्चिम येथील बस स्टँडजवळील मतदान केंद्र परिसरात बुथ लावणे आणि मतदारांना स्लिप वाटणे यावरुन शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. यामुळे मतदान केंद्राजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी हिंगोली शहरातील बाजार परिसरात मतदान केंद्र क्रमांक 3 येथे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एका महिला मतदाराला मार्गदर्शन करताना दिसले. तसेच, मतदान केंद्रामध्ये ‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं,’ अशी घोषणाबाजीही केल्याचा व्हिडीओमध्ये दिसून आले. तसेच, आमदार बांगर यांनी मतदान केंद्रात फोनदेखील वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मतदानाच्या दिवशी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रभाग २ आणि ३ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपाला गेला की त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी रिव्हॉल्वर दाखविल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातून हा राडा झाला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले.
त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र पोलीस आणि उमेदवार यांच्यातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्र्यंबकेश्वरमधील नूतन विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलीस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला.
मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजपा आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजपा उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. पण काही क्षणांतच या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. या गोंधळात भाजपाचे उपाध्यक्षांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली. या वादामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here