गुटख्याची वाहतूक करणारा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जेरबंद; ३६ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याची वाहतूक

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पोलिसांनी धडक कारवाई करत; ३६ लाखांचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. तर पुणे-मुंबई हायवेवर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यासह ट्रक असा मिळून एकूण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुटख्याची वाहतूक करताना पकडलेल्या आरोपीचे नाव नरेश गणेश चौधरी (वय २२, रा. भोसरी, पुणे) असे आहे. ही कारवाई बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आली आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाबाबत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता.
काल मंगळवार दि.०२ डिसेंबर रोजी पुणे-मुंबई हायवेवरील सर्व्हिस रोड लगत, बालेवाडी येथील ऑचिड हॉटेलजवळ पोलिसांच्या पथकाला ट्रक (क्र. MH-12-RN-3203) संशयास्पद स्थितीत आढळला. दोन पंचांसमक्ष या ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, त्यात ११ लाख ४७ हजार ९०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक देखील जप्त केला आहे. अशा प्रकारे जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३६ लाख ४७ हजार ९०० रुपये इतकी झाली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here