पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एक महत्त्वपूर्ण कामगिरी करत, चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या लुटमारीसाठी फिर्यादीची ‘टीप’ देणाऱ्या आणि त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
चिंचवड येथील केशवनगर परिसरात असलेल्या दीपक नरसाना यांच्या ‘श्रीजी सिरामिक’ दुकानाजवळ आशिष अरजनभा बुवा हे थांबलेले होते. त्याच वेळी, चार अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी बुवा यांच्यावर धारदार हत्याराने (कोयत्याने) हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपींनी दुकानातून ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटून नेली.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी फिर्यादीकडे असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळ काढला. गुन्हा करताना आरोपींनी केवळ लुटमार केली नाही, तर परिसरातील नागरिकांमध्ये कोयता नाचवून मोठी दहशत निर्माण केली आणि लोकांना धमकावले. या गंभीर प्रकारानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, आणि अपर पोलीस आयुक्त एस.डी. आवाड यांनी तपास पथकांना कठोर आदेश दिले होते.गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार, गुंडा विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्र फिरवले आणि अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले.
पोलिसांनी स्मशानभूमीजवळ, थेरगाव गावठाण येथून तीन आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. पोलिसांनी यश रमेश अंधारे (१८): रा. चांदणी चौक, थेरगाव गावठाण, पुणे (मूळगाव: भोनजे, ता. बार्शी, जि. सोलापूर). रितेश मुकेश चव्हाण (१८): रा. जगताप नगर नं. ४ व ५, थेरगाव, पुणे. यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीदरम्यान सर्व आरोपींनी आपण या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी त्यांना चिंचवड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.







