पुणे (उपसंपादक दिनेश खरोटे) । उत्तमनगर आणि शिवणे परिसरातील दोन सराफा दुकानांवर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. या गुन्ह्याचा शोध घेत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवघ्या २४ तासात या आरोपींना पुणे शहर युनिट ३ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
उत्तमनगर येथील एनडीए रस्त्यावर धावडे पेट्रोल पंपासमोर असलेल्या मोरया ज्वेलर्स येथे रात्री आठच्या सुमारास तिन्ही चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी दुकानात घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफ व्यावसायिकाने प्रतिकार करत आरडाओरडा केला. या प्रतिकारामुळे चोरटे खडकवासला धरणाच्या दिशेने पसार झाले. शनिवारी शिवणे परिसरातील आणखी एका विजयालक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तेथेही सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्यामुळे नागरिक जमा झाले. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
उत्तम नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपी धायरी भागात असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाच्या सहकार्याने सापळा रचून गुन्ह्यातील ४ अनोळखी आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशी करता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले असून, गुन्हे अभिलेख तपासला असता हे आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती समजली आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर पंकज देशमुख, उपआयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १ विजय कुंभार यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक युनिट ३ संपतराव राऊत, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, मारुती पारधी, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी यशस्वी केली आहे.







