भिवंडीत लाखो रुपयांच्या गावठी दारुचा साठा जप्त

गावठी दारु

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । जिल्ह्यातील भिवंडी, आलिमघर येथे एक हजार ११५ लिटर हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी रुपेश नारायण पाटील (३५) याला पोलिसांनी अटक केली असून, जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख ११ हजार ५०० रुपये असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.

भिवंडी गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार किशोर थोरात यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांच्या पथकाने रुपेश पाटील यांच्या भिवंडी आलिमघर येथील राहत्या घराच्या शेजारी असलेल्या खोलीमध्ये छापा टाकला. त्या वेळी एक हजार ११५ लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली.
याप्रकरणी आरोपी रुपेश पाटील याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि मिथुन भोईर, पोउनि रामचंद्र जाधव, रविंद्र बी.पाटील, पोहवा किशोर थोरात, प्रकाश पाटील, शशिकांत यादव, निलेश बोरसे, पोअं. सर्फराज तडवी यांनी ही कारवाई केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here