नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून गुटख्याची अवैध वाहतूक निझरमार्गे महाराष्ट्रात करण्यात येते. या गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनावर नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत 26 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुटखा तस्करी ची माहिती आधीच मिळाली असल्याने रात्रीपासूनच सापळा रचण्यात आला होता. सदर वाहन नंदुरबार येथील निझर रस्त्यावरील मंन्सूरी टेन्ट जवळ अडवण्यात आले. आयशर ट्रक क्रमांक एम एच 16 सीसी 8624 या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुरांच्या खाद्याच्या गोण्यांखाली गुटखा आढळून आला. अधिक चौकशी केली असता सदर गुटखा दोघांनी निझर येथून शीतल अग्रवाल यांच्या गोडाऊन मधून नंदुरबार मार्गे अहमदनगर येथील मोहसिन पटेल यांच्या सांगण्यावरून खरेदी केल्याची कबुली दिली.यावेळी पोलिसांनी 11 लाख 66 हजार 880 रुपये किमतीचा विमल गुटखा ,2लाख5 हजार920 रुपये किमतीचे तंबाखू पाकीट, 12 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक ,30 हजारांचे दोन मोबाईल, 27 हजारांची गुळाची ढेप असा एकूण 26 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वाहन चालक भास्कर विजय भोसले राहणार रामपुर तालुका राहुरी व संचालक मोहम्मद अजहरुद्दिन शकील शेख राहणार अहमदनगर या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.निरीक्षक किशोर नवले हवालदार मुकेश तावडे, राकेश मोरे ,राकेश वसावे दादाभाई मासुळे ,महेंद्र सोनवणे ,आनंदा मराठे, राजेंद्र काटके ,किरण मोरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली.







