अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर ठाणे पोलिसांची मोक्का अन्वये दुसरी कारवाई

अंमली पदार्थ

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । गांजाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात महात्मा फुले पोलीस ठाणे आणि कल्याण वाहतूक विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील एकूण १४ तस्करांपैकी सात जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सात फरार तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीला मकोका लावण्यात आला आहे. मकोका अंतर्गत कल्याण पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे, असे कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

अंमली पदार्थ घेऊन येणारे एक संशयास्पद कल्याणमधील वालधुनी पुलावरून येत आहे. अशी गुप्त माहिती ऑगस्टमध्ये कल्याण पोलिसांना मिळाली होती. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोगडे यांच्या पथकाने वालधुनी भागात रात्रीच्या वेळेत सापळा लावला होता. वालधुनी पुलावरून छत्तीसगड आरटीओ मंजूर असलेली वाहन क्रमांकाची एक मोटार जात होती.
पोलिसांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. तो वेगाने पुढे गेला. हीच संशयित मोटार असावी म्हणून पथकाने मोटारीचा पाठलाग केला. हवालदार सोनवणे यांनी मोटारीचा पाठलाग करून त्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मोटार चालकाने सोनवणे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. पथकाने ही कार शिताफीने अडवली. त्यात ३५ किलो गांजा, गावठी पिस्तुल आढळले होते, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.
या मोटारीतून पोलिसांनी मोहम्मद आसिफ, मोहम्मद शेख, फैजान शेख, समीर अली, आसिफ सय्यद यांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी, नागपूर, ओरिसा राज्यातून शाहिद अब्दुलगनी शेख, शाहीद शेख, रवींद्र मिर्धा यांना अटक केली होती. उर्वरित सात फरार तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत. या १४ जणांवर मकोका अंंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी नागपूर, अमरावती, भंडारा, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या आरोपींविरूध्द नागपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एकूण ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
या टोळीकडून साडे आठ किलो किमतीचा एकूण ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. ओरिसा राज्यातून गांजाची अधिक प्रमाणात खरेदी करून ते हा गांजा महाराष्ट्रातील ठाणे, नागपूर, मुंबई, नाशिक शहरात विक्री करत होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. ही कारवाई साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, पोलीस निरीक्षक विजय नाईक, उपनिरीक्षक विजय मडके, हवालदार धेरे, सोनवणे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.कल्याणजी घेटे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here