जळगाव (संपादक सुनिल पाटील) । जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण रोप लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ते चांगले दिसत असले तरी पुढील पाच वर्षा नंतर त्यावर वेगवेगळे कीडरोगांचा प्रादुर्भाव दिसतो काही ठिकाणी तर ती फुलारा सुद्धा धरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होऊन पाच वर्ष सांभाळल्यानंतर ती फळबाग काढून टाकणे कठिण होऊन जाते. असे असताना वैज्ञानिक दृष्टिकोन परिषदेच्या माध्यमातून संशोधकांनी दिला जात आहे. गेल्या दशकांमध्ये जैन स्वीट ऑरेजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारखी खासगी संस्था प्रभावी संशोधन करीत आहे ते शेतकऱ्यांसाठी मौलीक अशी गोष्ट आहे. असे सांगत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगली रोपे उपलब्ध करुन द्यावी असे मत परभणी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले.
देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) तांत्रिक सादरीकरणाच्यावेळी डॉ. अशोक धवन बोलत होते. बडिहांडा सभागृह आणि परिश्रम सभागृहात ‘तांत्रिक सत्र’ संपन्न झाले. याच परिषदेचा एक भाग म्हणून जैन संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील जैन स्वीट ऑरेंज च्या मातृवृक्ष ग्रीन हाऊस, मोसंबी लागवड क्षेत्र तसेच फळ प्रक्रिया उद्योग यासह क्लायमेंट स्मार्ट टेक्नॉलॉजीची प्रात्यक्षिके सर्व अभ्यासकांनी अनुभवली.
त्यात लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी करावयाच्या बाबींवरील संशोधन पेपर्स सादर करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. डॉ. येलेश कुमार यांनी उत्पादन वाढीसाठी रोपांची गुणवत्ता यावर सादरीकरण केले. नागपूरचे डी. टी. मेश्राम यांनी पिक निहाय पाण्याचे नियोजन, सेंन्सर सिस्टीम्, सरफेस इरिगेशनसह ऑटोमेशनचा वापर यातून पिकांची वाढ, ताण, फुलोरा आणि फळांची गुणवत्ता यावर सादरीकरणातून भाष्य केले. जैन इरिगेशनचे एम. एस. लधानिया यांनी रूट एअर प्रुनिंग, क्लायमेंट चेंज टेक्नोलॉजीवर सादरीकरण केले. त्यात त्यांनी जैन स्वीट ऑरेंज च्या विविध वाणांची माहिती दिली. मल्लिकार्जून बिरादार यांनी जैव उत्तेजक आणि सुक्ष्मपोषक घटकांच्या वापरातून लिंबूवर्गीय फळधारणा सांगितले. जैन इरिगेशनचे जगदीश पाटील यांनी जैन स्वीट ऑरेंजची सेंद्रीय पद्धतीने लागवड, आकाश शर्मा यांनी गोड संत्र्यांसाठी अनावश्यक वाढ होणाऱ्या फांद्यांची छाटणीवर सांगितले. लिंबूवर्गीय फळांच्या झाडांना ताणाखाली ठेवण्यासाठी मुळांच्या आकारात्मक पाण्याचे व्यवस्थापन यावर विश्वजित सिंग यांनी सादरीकरण केले. हायटेक ग्रीन हाऊस नर्सरी अंतर्गत लिंबूवर्गीय मायक्रोबडेड यावर जैन इरिगेशनचे डी.जी.पाटील यांनी वस्तूनिष्ठ सादरीकरण केले.







