पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करून तिला धमकावल्या प्रकरणी लष्कर पोलिसांनी एका जणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
बलराज संदुपटला (रा. संगमवाडा, भवानी पेठ) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात काम करतात. २३ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी जात असताना आरोपीने त्यांना अडवून अपमानास्पद शब्द वापरून विनयभंग केला; तसेच ‘तुझ्या मुलांना खोट्या पोलिस केसमध्ये अडकवतो,’ अशी धमकी देऊन पाठलाग करून त्रास दिला. अखेर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान, पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी २२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास शतपावली करत होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.







