बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी सचिन जगदाळे) | नांदुरा तहसील कार्यालयातील रेशन विभागामध्ये मागील दोन महिन्यांपासून गंभीर स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्या असून नागरिकांचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रेशन विभागात नियमित अधिकारी उपलब्ध नसल्याने तसेच ऑनलाइन कामकाजासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या जळगाव येथील गायकरवाड साहेब हे केवळ गुरुवार व शुक्रवार या दोनच दिवशी नांदुरा तहसील कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दोन दिवसांत नागरिकांची मोठी गर्दी होत असूनही अनेकदा अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. तहसीलदार साहेबांनी यापूर्वी परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
मागील गुरुवार व शुक्रवार रोजी देखील संबंधित अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. नागरिकांना केवळ कागदपत्रे आणून जमा करण्यास सांगितले जाते, मात्र त्यावर पुढील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून अनेक कामे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मागील चार वर्षांपासून रेशन विभागातील कामकाज संथ गतीने सुरू असून याचा मोठा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सोबत घेऊन नांदुरा तहसील कार्यालयात तात्काळ पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात यावा व नागरिकांची प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी ठोस मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात आज तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी ईश्वर पांडव, शिवसेना तालुकाप्रमुख नांदुरा, नांदुरा तालुक्यातील शेतकरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







