जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) | येथील भवानी नगर (अण्णा नगर) भागातील श्री साईबाबा मंदिर समितीच्या वतीने मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कीर्तन, पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार आणि बाल कीर्तनकार ह.भ.प. माउली महाराज काकडे (छोटा इंदुरीकर) यांचे कीर्तन. हे कीर्तन रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे.
सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साईबाबांची भव्य पालखी व मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘हरी होम बँड’ (भडगाव) आणि ‘श्री देव मामलेदार बँड’ (श्री रमाभाऊ कापडणीस) यांच्यातील शानदार जुगलबंदी भाविकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन ‘श्री बालाजी इव्हेंट्स’ यांच्याकडे आहे. वर्धापन दिन सोहळ्याची सांगता मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या भव्य महाप्रसादाने होईल.
या सोहळ्यासाठी नगरसेवक श्री. विकास गणपत पाटील, श्री. सुपडू नागो चौधरी, श्री. सतिश गौतम सावळे श्री भूषण कोल्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. तुषार धांडे आणि विनय सोनटक्के भूषवणार आहेत. श्री साईबाबा मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी आणि भवानी नगरमधील कार्यकर्ते या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या मंगलमयी सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री साईबाबा मंदिर समिती, भवानी नगर (नशिराबाद) यांच्या वतीने करण्यात आले आहे.







