जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी जळगाव शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे (जळगाव भाग), जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शपवन देसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या रूट मार्चमध्ये जळगाव शहर पोलीस ठाणे, शनिपेठ पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवडणूक कालावधीत शांतता राखावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश शहरभर पोहोचला आहे.







