जळगाव (संपादक सुनिल पाटील) | येथील जे.डी.एम.व्ही.पी.एस. नूतन मराठा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी उमामाहेश्वर मंदिर, उमाळा, ता. जि. जळगाव येथे पार पडला. हे विशेष हिवाळी शिबिर दिनांक 13 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या शिबिरामार्फत विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या शिबिराचे उद्घाटन ज्ञानेश्वर रामदास ठाकूर (सीमा सुरक्षा बल,संरक्षण मंत्रालय)यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल खडसे हे होते. यावेळी उमाळा गावाचे सरपंच सौं. प्रमिलाबाई चव्हाण पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उद्घाटक ज्ञानेश्वर ठाकूर यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, समाजसेवेची भावना व सामाजिक जबाबदारी निर्माण करणारी प्रभावी चळवळ असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती व सामाजिक प्रबोधनासाठी स्वयंसेवकांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अनिल खडसे यांनी विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व सामाजिक संवेदनशीलता विकसित होते, असे मत व्यक्त केले. पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष समाजकार्याची सांगड घालणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे वैशिष्ट्य असून अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचे उदघाटन पार पडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रा डॉ पी बी पाटील यांनी केले.
रा से यो शिबिराची सविस्तर भूमिका कार्यक्रम अधिकारी प्रा.घनश्याम पाटील यांनी मांडली.
उदघाटनाचे सत्राचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ललिता हिंगोणेकर यांनी तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनोहर नारखेडे यांनी केले.
उद्घाटन समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील मान्यवर नागरिक तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.







