सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । बार्शी शहर पोलीस ठाणे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या २८ बेवारस वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी (दि. २०) जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात बीड येथील वसिम स्क्रॅप मर्चंटने बाजी मारली असून, ही वाहने १ लाख ३८ हजार रुपयांना खरेदी केली आहेत.
पोलीस ठाणे परिसरात धूळ खात पडलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी मा. तहसीलदार बार्शी यांची रितसर परवानगी घेण्यात आली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी प्रसिद्धी देऊन नागरिकांना व व्यावसायिकांना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार २० जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या उपस्थितीत आणि दोन पंचांसमक्ष ही लिलाव प्रक्रिया पार पडली.
या लिलावात सहभागी होण्यासाठी विविध शहरांतील एकूण २४ भंगार व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. लिलावासाठी १,१५,०००/- रुपयांची मूळ किंमत निश्चित करण्यात आली होती. बोलीला सुरुवात झाल्यानंतर व्यावसायिकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर वसिम युसुफ शेख (रा. तेलगाव नाका, बीड) यांनी सर्वाधिक १,३८,०००/- रुपयांची बोली लावली. त्यांच्या नावावर लिलाव अंतिम करण्यात आला असून, ही रक्कम शासन जमा केली जाणार आहे.
सदर लिलाव प्रक्रिया पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हा लिलाव यशस्वी करण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गळगटे, पोहेकॉ सचिन कदम, पोहेकॉ विलास आडसूळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







