सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे झालेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) नागेश बनकर यांना आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘बेस्ट डिटेक्शन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते बनकर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तपासाची गती आणि कौशल्य
पाटकळ येथील खून प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नागेश बनकर आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ २४ तासांच्या आत खऱ्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (IAS), सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार (CP) आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (SP) यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिग्गज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बनकर यांचा झालेला गौरव हा मंगळवेढा पोलीस दलासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
या पुरस्कारामुळे कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाला पावती मिळाली असून गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी अशा कामगिरीची मोठी मदत होणार आहे नागेश बनकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलीस विभागात आणि मंगळवेढा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.







