अजित पवार अनंतात विलीन; पार्थ आणि जय यांनी दिला मुखाग्नी

अजित पवार

बारामती (संपादक सुनिल पाटील) । बारामतीमध्ये काल झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.यावेळी पोलिसांनी हवेत तीन राऊंड फायर करत अखेरची सलामी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “अजित दादा अमर रहे” आणि “अजित दादा परत या” अशा घोषणा दिल्या. “दादा, पुन्हा या,” अशा भावना व्यक्त करणारे नारे, अश्रूंनी ओलावलेले डोळे आणि शांत झालेले चेहरे संपूर्ण परिसर शोकमय वातावरणात बुडालेला दिसत होता. या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने अश्रूंनी डोळे भरून अजित पवारांना अखेरचा निरोप दिला.
अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. आज विद्या प्रतिष्ठान मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी कार्यकर्त्यांसह, राजकारणी आणि कुटुंबीयांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. दादांना अखेरचा निरोप द्यायला जनसमुदाय लोटला होता.
राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्तृत्ववान नेत्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. “नेतृत्व हरपलं, मार्गदर्शक हरपला, दादा परत या,” अशा शब्दांत सर्वसामान्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत प्रत्येकजण आपलं दुःख व्यक्त करत होता.अजित पवार
राज्य आणि देशपातळीवरील अनेक दिग्गज नेते या शोकसभेसाठी बारामतीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राहुल नारवेकर,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
याशिवाय विविध राज्यातील मुख्यमंत्री, विरोधी पक्षातीलही अनेक ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांचे नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले, ही बाब अजित पवारांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी ठरली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here