बोगस जन्म नोंदी, तपासासाठी एसआयटी स्थापन; किरीट सोमय्या भाटपुरीच्या भेटीवर

किरीट सोमय्या

पारोळा (प्रतिनिधी समाधान धनगर) । पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या ‘भाटपुरी’ गावाचा बोगस आयडी तयार करून तब्बल ४ हजार ९०७ खोट्या जन्म नोंदी केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे. आ. अमोल पाटील यानी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केलेल्या मागणीनुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या हे सोमवारी भाटपुरी येथे भेट देणार आहेत.

बिहारमधील आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने पारोळा तालुक्यात भाटपुरीनावाचे गाव नसतानाही, त्या नावाचा १३ बोगस आयडी तयार केला. २०१० ते २०२५ या कालावधीत त्याने या आयडीचा वापर करून ४ हजार ९०७ बोगस जन्म दाखल्याच्या नोंदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे असेल पथक
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये खालील अधिकाऱ्याऱ्यांचा समावेश आहे. तपास अधिकारी विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर) सहाय्यक तपास अधिकारी अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पारोळा), सदस्य सतीष गोराडे (पीआय, सायबर पोलीस स्टेशन), मुस्तफा मिर्झा (पीएसआय, सायबर), शरद पाटील व दिलीप चिचोले.
किरीट सोमय्यांचा दौरा
बोगस जन्म नोंदींचे हे रॅकेट आंतरराज्यीयस्तरावर पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या हे आज भाटपुरी गावाला भेट देऊन माहिती घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्यामुळे प्रशासकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here