तरुण व्यावसायिकाला बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीची धमकी

crime
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । तरुण व्यावसायिकाला बिश्नोई टोळीच्या नावाने तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सलग दोन दिवस या व्यापाऱ्याला धमकीचे कॉल येत होते. हे कॉल परदेशी व्हीपीएन वापरून केल्याने कॉलचा उगम शोधणे कठीण झाले आहे. धमकी देणाऱ्यांनी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित फरार गुन्हेगारांची नावे घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घाबरलेल्या व्यापाऱ्याने अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंद होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे. कॉलची सत्यता, टोळीशी असलेला संबंध आणि तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सायबर तज्ज्ञांसह चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात कॉल परदेशातील एका ओळखीच्या बेटावरील लोकेशनवरून आल्याचे संकेत मिळाले असून, प्रकरणाला आंतरराष्ट्रीय डिजिटल गुन्हेगारीचा धागा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती, जो तुरुंगात असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. सायबर फॉरेन्सिक, आर्थिक व्यवहार आणि टोळीशी संबंधित माहितीचा सखोल तपास सुरू आहे. लक्ष्य केलेला व्यापारी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रात ओळखीचा असल्याचे सांगितले जात असून, बॉलिवूड व राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तींशी त्याचे व्यावसायिक संबंध असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. २००६ साली या भागात खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण व हत्या झाल्याची घटना लक्षात घेता पोलिस अत्यंत सावधगिरीने तपास करत आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here