जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । शेती साहित्यावर मिळणारी सबसीडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकार्यासह तिघांना जळगाव एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केली.
आंबेवडगाव, ता.पाचोरा येथील शेतकर्याने शासन योजनेअंतर्गत नांगर आणि रोटर खरेदी केले होते. या साहित्यावर शासनाकडनू सबसीडी (अनुदान) मिळत असल्याने त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला. साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करून अनुदान मंजूर करून देण्यासाठी उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी सहा हजारांची लाच मागितली व पाच हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला.
याप्रकरणी उपकृषी अधिकारी लिलाधर शिवाजीराव देशमुख तसेच खाजगी व्यापारी संजय प्रभाकर पाटील व पंटर नितीन इंदलसिंग निकम या तिघांना अटक करण्यात आली आहे.







