शिरढोणमध्ये क्रेनच्या हुकचा फटका बसून कामगाराचा मृत्यू

accident
file photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । डोंबिवलीपासून आठ किलोमीटर अंतरावरील शिरढोण गाव हद्दीत म्हाडाचा समुह गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता निर्माणाधिन इमारतीला बसविलेल्या क्रेन मास्टची उंची एका कामगार वाढवित होता. यावेळी अति उच्च ताणाचा क्रेनचा सिलिंग हुक कामगाराच्या हातामधून सटकल्याने त्याचा फटका कामगाराच्या कपाळाला बसून तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी संध्याकाळी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

विजयनाथ रामबहादुर कुशवाहा (४०) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते शिरढोण येथील कामगार वसाहतीत राहत होते. ते मुळचे उत्तरप्रदेशातील देवरीया जिल्ह्यातील चौरडीहा गावचे रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते डोंबिवली परिसरात राहत होते. या अपघाताची तक्रार क्रेन तंत्रज्ञ अरविंद गौतम (१९) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी केली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शिंदे यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली. या अपघात प्रकरणाची मानपाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवलीत निर्माणाधिन इमारतींवर काम करताना चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here