चीनच्या भ्याड हल्ल्यात कर्नलसह १९ जवान शहीद

लडाख : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी आकस्मिक केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवान आणि चिनी सैनिकांत जोरदार धुमश्‍चक्री उडाली. भारतीय लष्करातील एक कर्नल तसेच अन्य दोन जवान त्यात शहीद झाले, असे पीटीआयचे वृत्त आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी भारतीय कर्नलसह 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त दिले आहे.
तब्बल 45 वर्षांनी 1975 नंतर भारत-चीन सीमेवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील दोन्ही अण्वस्त्र सज्ज देशांच्या सैनिकांमध्ये दगडफेक आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले. कुरापत चिनी सैनिकांनीच केली होती. उत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 43 चिनी सैनिक ठार झाले आहेत, तर 11 चिनी सैनिक जखमी झाले आहेत. दोन्ही देशांनी अधिकृतपणे कोणाकडूनही गोळीबार झाल्याचे म्हटलेले नाही. दोन्ही बाजूंचे सैनिक लाठ्या-काठ्यांनीच परस्परांशी लढले, असे दोन्ही अण्वस्त्र सज्ज देशांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, गोळीबार झाल्याशिवाय कर्नल दर्जाच्या अधिकार्‍यासह 20 जवान शहीद होण्याची घटना घडली, यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे, असे सांगण्यात येते. भारत आणि चीन यांच्यामध्ये वरिष्ठ लष्करी पातळीवर तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू असतानाच चीनने ही कुरापत काढली आहे.
भारतीय जवानांच्या हल्ल्यात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र, चीनने त्यांचे केवळ 5 सैनिक मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांतील वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांदरम्यान झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार चिनी सैनिकांनी गलवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय हद्दीतून मागे हटावे म्हणून भारतीय जवानांनी आग्रह धरला. चिनी सैनिकांनी त्याला विरोध केला आणि संघर्षाला सुरुवात झाली.
या वृत्ताला भारतीय लष्करी सूत्रांनी दुजोरा दिला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने चीनचे 43 सैनिक ठार झाल्याची बातमी दिली आहे. दरम्यान, लंडनमधील ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने कर्नलसह 13 भारतीय जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त दिले आहे. शहीद कर्नल इन्फन्ट्री बटालियनचे कमांडिंग अधिकारी होते. बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू असे शहीद कर्नल यांचे नाव असून, ते तेलंगणाचे आहेत. तर शहीद जवानांपैकी एक तामिळनाडूचे असून, त्यांचे नाव पलानी आहे. दुसरे शहीद जवान डिहारी येथील कुंदनकुमार ओझा हे आहेत.
1962 च्या युद्धानंतर 11 सप्टेंबर 1967 रोजी सिक्‍कीमच्या नाथू-लामध्ये भारत-चीन धुमश्‍चक्री झाली होती. नंतर 15 सप्टेंबर 1967 रोजी त्याची पुनरावृत्ती झाली. भारताचे 88 जवान शहीद झाले होते. भारतीय जवानांनी 340 चिन्यांना कंठस्नान घातले होते. चोला धुमश्‍चक्रीतही भारताचे 36 जवान शहीद झाले होते. या संपूर्ण संघर्षात 400 चिनी सैनिकांचा खात्माही झाला होता. ऑक्टोबर 1967 मध्ये तणाव निवळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here