लंडन : वृत्तसंस्था – कोरोनावर व्हॅक्सिन तयार करण्यात जगभरातील संबंधित शास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. मात्र, जोवर व्हॅक्सिन येत नाही तोवर कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारे वृत्त ‘बीबीसी’ने दिलेले आहे. वृत्तानुसार ‘डेक्सामेथासोन’ एक जुनेच व स्वस्त औषध आहे. कोरोनाने गंभीर स्थिती बनलेल्या अनेक रुग्णांचा जीव या औषधामुळे वाचविण्यात वैद्यकाला यश आलेले आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये या औषधाने आशेचा किरण निर्मिला आहे.
अनेक आजारांमध्ये इन्फ्लॅमेशन घटविण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. ब्रिटनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रिटनमध्ये हे औषध आधीपासून उपलब्ध असते, तर 5 हजार लोकांचा जीव वाचविता आला असता. 20 रुग्णांना हे औषध देण्यात आले असता पैकी 19 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांनाही या औषधाने लाभ झाला. चाचणीदरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका चमूने रुग्णालयात दाखल 2 हजार रुग्णांना हे औषध दिले व यांची तुलना हे औषध ज्यांना देण्यात आलेले नाही, अशा अन्य 4 हजार रुग्णांशी करण्यात आली. त्यावरून हा निष्कर्ष काढला गेला आहे. व्हेलेटरवरील रुग्णांवरही या औषधाचा चांगला परिणाम झाला आहे.






