गोंदिया (प्रतिनिधी) । जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय विध्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून विध्यार्थ्याच्या आईने आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धैर्य मनोज मिश्रा (वय ९) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असतांना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले, तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला. त्या विद्यार्थिनीने ही बाब शोभा गिरडकर शिक्षिकेला सांगितली. त्यांनतर धैर्यला बोलावून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
शाळेतून घरी आल्यानंतर धैर्यने झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना माहिती दिली. सायंकाळी धैर्यची आई राणी मिश्रा घरी आल्यानंतर मोठ्या मुलाने घडलेली सगळी घटना आईला सांगितली. आपल्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत त्या संतप्त झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमगाव पुलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेनंतर धैर्य शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे आईने सांगितले.“माझ्या मुलाने काही चुकीचे बोलले नव्हते. गैरसमजातून त्याला मारहाण करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला आहे.
राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा करण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षिकेवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







