चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमधून ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा

चंद्रपूर (प्रतिनिधी) । शहरातील उर्जानगर परिसरात बनावट नोटा छापण्याच्या कारखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेला याची मिळाल्यानंतर त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकत पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. १० मार्च रोजी उर्जानगर मेजर गेट परिसरातील ‘राजश्री अपार्टमेंट’ येथे काही व्यक्ती अवैधरित्या बनावट नोटा तयार करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ वर छापा टाकला.
हाती आलेल्या माहितीनुसार हा फ्लॅट बंगाली कॅम्प परिसरातील सुमित पॉल यांचा आहे. त्यांनी एक महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना भाड्याने दिला होता. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता आतमध्ये बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे १० बॉक्स जप्त केले.
नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९१ लाख १५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर (वय २६) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here