ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । उल्हासनगर गुन्हे शाखेने वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून व भुरळ घालून हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. राजू चव्हाण, रमेश जयस्वाल, संजय मांगडे आणि एका सोनारासह टोळीला अटक करून, त्यांच्याकडून १३० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे १७ लाख रुपये) हस्तगत केले आहेत. या टोळीने ठाणे आणि मुंबई परिसरात १२ गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांना साथ देणाऱ्या एका सोनारालाही बेड्या ठोकल्या आहेत.
नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये वृद्ध नागरिकांची फसवणूक करून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. उल्हासनगर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अखेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
या प्रकरणी पोलिसांनी राजू प्रकाश राठोड (वय ४८), रमेश विजयकुमार जैस्वाल (वय ४९) आणि संजय दत्ताराम मांगे (५३) या दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी सार्वजनिक ठिकाणी एकट्या असलेल्या वृद्ध नागरिकांना गाठायचे. त्यांना बोलण्यात गुंतवून किंवा काहीतरी भ्रमित करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी आणि खिशातील रोख रक्कम हातचलाखीने काढून घेत असत.
केवळ चोरी करणारेच नाही, तर चोरीचे सोने विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी सोडले नाही. वडाळा (मुंबई) येथील ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’चा मालक रामसिंग लालसिंग चौव्हाण याला पोलिसांनी थेट राजस्थानमधील त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे.
पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या मुद्देमालाची किंमत अंदाजे १६ लाख ५९ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या अटकेमुळे बदलापूर, उल्हासनगर, ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले १२ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे, अशोक थोरवे, योगेश वाघ, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि गणेश गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.







