जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि साहित्यपरंपरा जपणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करणारा २७ फेब्रुवारी हा दिवस रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. मंगलमय वातावरणात सादर झालेल्या सरस्वती वंदनेने संपूर्ण सभागृह भारावून गेले. त्यानंतर जिजामातेच्या वेशभूषेत एका विद्यार्थिनीने केलेली प्रभावी शिवगर्जना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारी ठरली. तिच्या दमदार सादरीकरणानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले.
प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्रज्ञ अमोल जोशी तसेच मराठी मंडळ, भोपाळच्या अध्यक्षा सौ. शैला प्रधान यांची उपस्थिती लाभली. आपल्या प्रेरणादायी मनोगतातून त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील मराठीचे योगदान ोआणि मातृभाषेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रगती करताना आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी केलेले आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सूत्रसंचालन. त्यांच्या ओघवत्या, शुद्ध आणि प्रभावी मराठीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असूनही विद्यार्थ्यांची मराठीवरील पकड अत्यंत उत्तम असल्याचे सर्वांनी कौतुकाने नमूद केले.
या निमित्ताने कविता वाचन, अभंग गायन, मराठी भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिका, प्रभावी भाषणे यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि ‘किल्ला बनवा’ स्पर्धा यांसारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी साकारलेले ऐतिहासिक किल्ल्यांचे देखावे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमात विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता, अभंग आणि नाट्यप्रयोगांतून मराठी भाषेचा गोडवा, तिची ताकद आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे अधोरेखित झाला.*शाळेच्या अध्यक्षा महोदया सौ. रोजमीन खिमानी प्रधान या सध्या United States येथे वास्तव्यास असल्या तरी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्या भारतात विशेष उपस्थित राहिल्या. आपल्या मनोगतातून त्यांनी मराठी भाषेबद्दलचा जिव्हाळा आणि अभिमान अत्यंत उत्कटतेने व्यक्त केला.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असतानाही विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, आदर आणि संस्कृतीची जाणीव जोपासली जात असल्याचा त्यांनी आनंदाने उल्लेख केला.यावेळी त्यांनी ‘कणा’ ही अर्थपूर्ण कविता सादर करून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नात्याची सुंदर ओळख करून दिली. त्यांच्या प्रभावी व भावपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरूंचा सन्मान राखत जीवनात यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे विशेष कौतुक केले व भविष्यातही अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मराठी भाषेचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. मराठी भाषेचा अभिमान जपत तिची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा मराठी भाषा गौरव दिन सोहळा संस्मरणीय ठरला.







