- विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
- साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
- मराठी भाषा विभाग पुरस्कारांचे वितरण
नाशिक (संपादक सुनिल पाटील) । स्व.अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे मराठी भाषा विभागाचे अंदाजपत्रक २६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. बोाली भाषा समृद्ध व्हावी यासाठी बोली भाषा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम सुरू असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला होईल. मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी लंडन येथे राज्य शासनाने मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती येत्या तीन महिन्यात गठित करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून साहित्य प्रकाशनासाठी मदत केली जाईल. संत वाड्मय मराठी भाषेचा पाया असून संत वाङ्मयाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न केले जातील.
उदघाटक म्हणून बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्य, नाट्य आणि लोकगितांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे. मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झाली, तरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या इतिहासात स्वभाषेचा अभिमान आणि भाषाशुद्धी सर्वप्रथम शिकवली. परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केल्याने आपल्या राज्य कारभारात फारसी, अरबी शब्द होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचा कोष तयार केला. आधुनिक महाराष्ट्रात भाषा शुद्धीकरणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. मराठी भाषेच्या सेवेची ही महान परंपरा नाशिक जिल्ह्याने जोपासली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, नाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमी, संत, विचारवंत, कवी, लेखकांची भूमी आहे. येथे मराठी भाषेचा कुंभमेळा विश्व मराठी संमेलनानिमित्त भरला आहे. मराठी ही मातीशी जोडलेली भाषा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंडळाला ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय साहित्य व संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.







