पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | पारनेर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्व पूर्ण असलेला व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीच्या कल्याण जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ पद्धतीने सुरू असून कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत , ही चिंताजनक बाब असून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष घालून देशाची होणारी लूट व होणारी प्राणहानी थांबवावी, अशी कळकळीची मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष व सरपंच रविंद्र राजदेव यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
सरपंच रविंद्र राजदेव निवेदनात पुढे म्हणतात की ,नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाबाबत अत्यंत गंभीर प्रकारच्या तक्रारी असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे . सावरगाव, काळेवाडी परिसरात सिमेंट काँक्रीट टाकल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी न मारल्यामुळे लगेचच या कामाला भेगा पडल्या आहेत . त्यामुळे या कामाचा दर्जा खालावला आहे , हा रस्ता वापरण्या आधीच खराब झाला असून हे काम केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करून होत आहे परंतु त्याच्या दर्जा कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे . या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कोणताही सुरक्षा रक्षक , सुरक्षा व्यवस्था , सूचना फलक किंवा दिवे लावलेले नाही . त्यामुळे अपघातांचा प्रचंड धोका वाढला आहे .
नुकतेच काळेवाडी येथे निष्काळगीपणामुळे झालेल्या अपघातात एका तरुणांचा हकनाक बळी गेला आहे . त्यासाठी संबंधित ठेकेदार व यंत्रणेला जबाबदार धरले पाहिजे . कामाच्या ठिकाणी कोणताही शासकीय अधिकारी फिरकत नाही वा फिरताना दिसत नाही . ठेकेदाराकडून केवळ अनुभव नसलेले अभियंते उभे करून काम सुरू केले जात आहे . कुठलाही प्रकारची कामाची गुणवत्ता तपासली जात नाही . सावरगाव , काळेवाडी , मानेवाडी , नांदुर पठार येथील स्थानिक ग्रामस्थ या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येबाबत चिंतेत आहे . विकासाच्या नावाखाली सुरक्षा व दर्जा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे . जेथे काम झाले आहे , ते पुर्ण दर्जा हिन झाले असून ते पुन्हा नव्याने तोडून तयार करण्यात यावे . या महामार्गावर ज्या लोकांचे अपघाताने मृत्यू झाला , त्या लोकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी . नजिकच्या ८ दिवसात या कामाची तात्काळ चौकशी करून कामाचा दर्जा सुधारला नाही , तर पुढील आठवड्यात परिसरातील संपूर्ण २५ गावांचे ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम थांबवण्यात येईल , असाही इशारा ही देण्यात आला आहे .
या राष्ट्रीय महामार्गावर असणारे काळेवाडी , सावरगाव फाटा , कर्जुले हर्या , टाकळी ढोकेश्वर शहर , वासुंदे चौक , पारनेर चौक , नगर वरून येणाऱ्या वाहनांनी टाकळी ढोकेश्वर गावात प्रवेश करताना वाहनांचा वेग कमी होण्यासाठी गती रोधक टाकण्यात यावे , जेणेकरून अपघाताचा धोकाही कमी होऊ शकतो , असेही सरपंच रवींद्र राजदेव यांनी निवेदनात उल्लेख केला आहे .







