सायबर चौक परिसरात अंमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; १२ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची कारवाई

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर नियाज जमादार)। शहरातील सायबर चौक परिसरात अमली पदार्थ विक्रीविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत हायड्रोपोनिक गांजा व एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एकूण सुमारे  १२ लाख ४७ हजारांचा   मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती निळ्या रंगाच्या मोपेडवरून सायबर चौक परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायबर चौक परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान संशयितांची झडती घेतली असता ३१.३१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (रु. ३ लाख १३ हजार), ६८.८७० ग्रॅम एमडी ड्रग्ज (एकूण सुमारे रु. ६ लाख ८८ हजार) तसेच मोबाईल हँडसेटसह इतर मुद्देमाल असा एकूण रु.१२ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अब्राहम जॉकी घोन्सालीस (रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) व शाहीद इब्राहीम मोकाशी (रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील तसेच पोलीस कर्मचारी संदीप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील व सचिन पाटील यांनी सहभाग घेतला.

सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत.शहरात अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here