जळगाव (संपादक सुनिल पाटील) | संपूर्ण जगाचे आराध्यदैवत आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर बाबा ऊर्फ धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बागेश्वर बाबा यांनी एका जाहीर कार्यक्रमात शिवरायांबद्दल चुकीचे आणि वादग्रस्त विधान करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. थोर पुरुषांचा आणि ऐतिहासिक सत्याचा अशा प्रकारे वारंवार अवमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि महापुरुषांची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडे निवेदनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी बागेश्वर बाबावर कठोर कलमान्वये गुन्हा नोंदवावा, महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या अशा व्यक्तींना राज्यात कार्यक्रम करण्यास परवानगी देऊ नये, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांवर कायदेशीर चाप बसवावा अशा मागण्या करण्यात आल्या हेत.
यावेळी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
या निवेदनावर विशाल सपकाळे, उपतालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, महिला अध्यक्ष प्रतिभा विजय सोनवणे, ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष नितीन रमेश चौधरी, बापू सोनवणे, सोशल मिडीया प्रमुख गणेश भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.







