श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाई : सोलर पंपाच्या अमिषाने शेतकऱ्यांची लाखोची फसवणूक करणारा गजाआड

श्रीगोंदा

श्रीगोंदा (क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे)  शासकीय योजनेतून सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सराईत ठगाला श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुपेश अशोक पवार (रा. कानमंडले, ता. चांदवड, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आरोपी रुपेश पवार याने एका फाउंडेशनच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. शासकीय सोलर पंप योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगून त्याने विविध शेतकऱ्यांकडून तब्बल ७ लाख ८० हजार रुपये उकळले होते. पैसे घेऊनही सोलर पंप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी नोव्हेंबर २०२५ मध्ये अशोक भोसले यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी रुपेश पवार हा पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो मुंबईत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मुंबईत त्याचा पाठलाग केला, मात्र तो तिथून निसटून नाशिक जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पोहोचला.

आरोपी आपल्या मूळ गावी आल्याची पक्की माहिती मिळताच, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कानमंडले (ता. चांदवड) येथे सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तसेच यामागे काही मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा प्रकारे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि शासकीय योजनांसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा कार्यालयाशीच संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here