कोल्हापूर येथील कणेरी मठात रंगले संस्कारांचे लेणे: बालरंगभूमी परिषदेच्या निवासी शिबिरात ४८० बालकांचा सहभाग

कणेरी मठ

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) | जीवनात संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संस्काराशिवाय मानवी जीवन शून्य असून, उत्तम संस्कारच मनुष्याला श्रेष्ठत्व आणि जीवनाला योग्य आकार मिळवून देतात. हाच उदात्त विचार समोर ठेवून, संस्कारांना कलांची जोड देत बालकांची सृजनशीलता फुलवण्यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर येथील निसर्गरम्य कणेरी मठ येथे तीन दिवसीय निवासी ‘कला-संस्कार’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील ४८० बालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कला आणि संस्कारांचे धडे गिरवले.

 

योगाभ्यास
कला संस्कार शिबिरातील दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने होत असे.

सर्वोत्तम जीवनाचा पाया हा उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. आपली संस्कृती, नियमित दिनचर्या आणि आहारनियमांचे पालन करणे हे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. कणेरी मठाच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या शिबिराचे पहिले सत्र दि. २ ते ४ मे दरम्यान संपन्न झाले. विशेष म्हणजे, बालकांसाठी हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आले होते.

चित्रकला
चित्रकला व मास्क मेकिंगच्या रंगात रंगलेली बालके

या शिबिराचा मुख्य उद्देश मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन सहभोजन, सहनिवास आणि स्वयंपूर्ण जीवनशैलीची ओळख करून देणे हा होता. अनुभवातून स्वावलंबन आणि प्रसंगावधान वाढवण्यावर येथे भर देण्यात आला. शिबिरात भारतीय कला व संस्कृतीची, भारताच्या समृध्द इतिहासाची तसेच ग्रामीण जीवनातील बारा बलुतेदार, कृषीजीवन यांची ओळख सिध्दगिरी आश्रमाच्या ग्रामजीवन संग्रहालयातील सहलीदरम्यान करुन देण्यात आली. श्रवण, मनन आणि निरीक्षणातून ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून व पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य वृध्दींगत होण्यासाठी योगाभ्यास आणि रंगमंच खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यातून सकाळी सहा वाजता योगाभ्यास व रंगमंचीय खेळातून स्मरणशक्ती, वाचन, उच्चार, आवाजाचे चढउतार याबाबत सांगण्यात आले.

चित्रकला व मास्क मेकिंग कार्यशाळेत रंगांची ओळख, त्यांचा वापर यासह बालकांमधील सृजनशीलता वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात आले.जुन्या पिढीतील विस्मरणात गेलेल्या मैदानी खेळ खो – खो, कबड्डी, भोवरा, विटी दांडू, पतंग उडविणे, रस्सीखेच या खेळांचा आनंद बालकांनी घेतला. शिबिरात मूल्यशिक्षणावरही भर देण्यात आला होता. प्रार्थना, श्लोक पठण दररोज सायंकाळी घेण्यात आले. पाद्यपूजनाच्या संस्कारातून घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच गुरुजनांचा आदर राखण्याचे संस्कार देण्यात आला. शिबिरार्थींसाठी शिवकालीन लाठी काठी, तलवार, दांडपट्टा यांची प्रात्याक्षिके ठेवण्यात आली होती. काही उत्साही शिबिरार्थींनी लाठी काठीचे धडेही प्रशिक्षकांकडून गिरवले. तसेच सिध्दगिरी आश्रमातील गोशाळेची सहल घडवून गोमातेचे महत्व सांगण्यासोबत, तेथे होणाऱ्या उत्पादनांची, त्यांच्या निर्मितीची माहिती बालकांना देण्यात आली.

अभिवाचन
शब्द सुरात रंगलेले बालकलाकार

केवळ मुलांवरच नव्हे, तर त्यांच्या कौटुंबिक वातावरणावरही काम करण्यासाठी या शिबिरात पालकांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मुलांचा बुद्ध्यांक (IQ) वाढवण्यासोबतच त्यांचा भावनात्मक विकास (EQ) कसा साधता येईल, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मुलांचे भावविश्व समजून घेत त्यांचा सामाजिक व शैक्षणिक विकास घडवण्यासाठी पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे विविध कृतीरुप सत्रांतून स्पष्ट करण्यात आले.

बालरंगभूमी परिषदेच्या या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या सत्रात बालरंगभूमी परिषदेच्या सोलापूर, अहिल्यानगर (अहमदनगर), लातूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बृहन्मुंबई, धुळे, परभणी आणि इचलकरंजी शाखांमधील ४८० मुले-मुली, शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते.

या सर्व शाखांच्या प्रतिनिधींच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे पहिले सत्र अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले. निसर्गाच्या कुशीत विनामूल्य मिळालेल्या या संस्कार शिदोरीमुळे मुलांमध्ये एक नवा उत्साह आणि चैतन्य संचारल्याचे पाहायला मिळाले.

पतंग
मैदानी खेळात पतंग उडविण्यात गर्क झालेली बालके
निरोपाचा क्षण
तिसऱ्या दिवशी शिबिर समारोप सोहळ्यात निरोपाचा क्षण भावनिक झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here