कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर नियाज जमादार)। करवीर पोलिसांनी बाचणी (ता. करवीर) येथील सर्जेराव गणपती साळोखे (वय ५०, रा. साळोखे चौक, ता. करवीर) याच्या शेतात छापा टाकून १ लाख १८ हजार ५० रुपये किमतीची अफूची ७८० ओली रोपे, पाने, फुले, बोंडे असा मुद्देमाल हस्तगत केला. करवीर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. संशयित साळोखेला ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयित साळोखे याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने बाचणी गावाच्या हद्दीत बाचणी ते हिरवडे खालसा जाणार्या रोडवर जमीन गट क्रमांक ४४३ बाचणी येथे अफूच्या रोपाची लागवड केल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर यांच्यासह पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली व ३९.३५० किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बाजारभावाने त्याची किंमत प्रतिकिलो ३ हजार रुपये असल्याचेही पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, नाथा गळवे, राहुल देसाई, सुभाष सरवडेकर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकारीही उपस्थित होते. आरोपीवर करवीर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याच्या कलम ८(क) आणि १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.







