पुणे (उपसंपादक प्रशांत महाजन) | केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान मोफत वीज योजने’ची (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरणच्या आकुर्डी उपविभागाने कंबर कसली आहे. या योजनेचा प्रसार करण्यासाठी आकुर्डी उपविभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, आज विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आकुर्डी उपविभागांतर्गत येणाऱ्या संभाजी नगर शाखा व घरकुल शाखा यांच्या वतीने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी चिखली शाखा, भीमशक्ती नगर, नेवाळे वस्ती आणि मोरे वस्ती या परिसरात प्रत्यक्ष घरोघरी भेटी दिल्या. सौर ऊर्जेचा वापर आणि त्यातून मिळणारी मोफत वीज याबाबतची तांत्रिक माहिती यावेळी नागरिकांना सोप्या भाषेत देण्यात आली.
या उपक्रमात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, सहायक अभियंता श्याम दिवटे, सहायक अभियंता महादेव मुंडे आणि सहायक अभियंता पल्लवी देशपांडे उपस्थित होते. या मोहिमेला पाठबळ देण्यासाठी युवा नगरसेवक यश साने यांनीही उपस्थिती दर्शवली आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.








