पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकसह विविध शहरांतून चोरलेल्या एकूण ३६ लाख रुपये किमतीच्या २४ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ एप्रिल २०२६ रोजी संदीपकुमार निसाद यांची स्प्लेंडर मोटार सायकल चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महाळुंगे ते जुन्नर या ८० किलोमीटरच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी यश सुनील हांडे (वय १९) आणि किरण संभाजी जाधव (वय २६) या दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुणे शहरासह नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरातून गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. हस्तगत केलेल्या २४ गाड्यांमध्ये रॉयल एनफील्ड बुलेट, यामाहा आर-१५, होंडा शाइन आणि पल्सर यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे पुणे, मुंबई आणि नाशिकमधील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चेतन सावंत करत आहेत. 







