धरणगाव–भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई दोन गावठी बंदुकांसह जीवंत काडतुसे जप्त

crime
file photo

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (१४ मे) धडक मोहीम राबवत दोन मोठ्या कारवाया केल्या. धरणगाव आणि भुसावळ येथे करण्यात आलेल्या या स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी दोन गावठी बनावटीच्या बंदुका (पिस्तूल), मॅगझिन आणि जिवंत काडतूस असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पहिल्या कारवाईत धरणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने गिरणा नदीच्या पात्रात केली. एक इसम संशयास्पद रित्या वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १४ मे रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून आनंदा बळीराम सपकाळे (३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळून २५,००० रुपये किमतीची लोखंडी सिल्व्हर रंगाची गावठी बंदूक आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. संशयिताकडे शस्त्राचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा (रजि. नं. १८७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पीएसआय दत्तात्रय बडगुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

दुसऱ्या मोठ्या कारवाईत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिरपूर-कन्हाळा रस्त्यावरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या परिसरात केली. मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून असद अली शेख खालीद अली (१९, रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ). या दोन संशयितांना जेरबंद केले.

त्यांच्याजवळून  ४०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असलेली गावठी बंदूक, मॅगझिन आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस (एकूण ४१,००० रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here