पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न; ४ कोटी २६ लाखांची वसुली, ३ तुटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र

पाचोरा न्यायालय

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शेख जावीद) | पाचोरा न्यायालय प्रांगणात तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच (९ मे रोजी) राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीचे अध्यक्षपद पाचोरा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) एस. व्ही. निमसे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विजय बनसोड उपस्थित होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ४ कोटी २६ लाख २१ हजार ५६१ रुपयांची विक्रमी वसुली झाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद सामोपचाराने मिटवण्यात आले.

मुख्य न्यायाधीश एस. व्ही. निमसे आणि सह न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०६ प्रलंबित प्रकरणे या लोकअदालतीत निकाली काढण्यात आली. यामध्ये तब्बल ३ कोटी ७० लाख ३६ हजार ६७६ रुपयांची वसुली झाली. याशिवाय, कोर्टात जाण्यापूर्वीची २४ वादपूर्व (Pre-litigation) प्रकरणेही तडजोडीने मिटवण्यात आली, ज्यातून ५५ लाख ८४ हजार ८८५ रुपयांचा वसूल मिळाला.

या लोकअदालतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यात मिळालेले यश. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांमधील जोडप्यांमध्ये वकिलांच्या मध्यस्थीने सकारात्मक तडजोड घडवून आणण्यात आली. अपेक्षा सुतार व चंद्रकांत सुतार, सरिता गणेश पाटील व गणेश पाटील, प्रियंका आकाश व आकाश रमेश या तिन्ही जोडप्यांनी जुने वाद विसरून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ती आनंदाने नांदावयास गेली. याप्रसंगी माननीय न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांनी तिन्ही जोडप्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. यासाठी ॲड. रणसिंग राजपूत, ॲड. गोपाळ पाटील, ॲड. राजेंद्र पाटील आणि ॲड. पी. बी. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

“न्यायालयातील फेऱ्या, वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी यापुढेही अशा लोकअदालतींमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी लोकन्यायालयाच्या पंच ॲड. भाग्यश्री महालपुरे, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष कविता मासरे, पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रवींद्र ब्राह्मणे यांच्यासह सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ, बँक अधिकारी, महावितरण (MSEB), बीएसएनएल (BSNL) चे कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here