आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जळगावात समन्वय बैठक; कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

बकरी ईद

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शेख जावीद) | आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन आणि विविध शासकीय विभागांची महत्त्वाची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महानगरपालिका, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सण शांततापूर्ण, पवित्र आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये एसआरपीएफ (SRPF) जवान आणि होमगार्ड पथकांचा समावेश असेल. संवेदनशील ठिकाणे, प्रमुख चौक, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांत पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.

तसेच ‘गुड मॉर्निंग स्क्वॉड’ अलर्ट मोडवर असून, समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींना आधीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी चेक नाके सक्रिय करण्यात आले असून संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असून, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मुस्लिम नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे, की शासनाच्या नियमांनुसार गोवंश हत्या हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नये. वय वर्ष कमी असलेल्या तसेच गरोदर जनावरांची कत्तल करू नये. केवळ टॅग केलेल्या जनावरांचीच कत्तल करावी. कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर कत्तल अथवा मांसाची विक्री करू नये.

सणादरम्यान शहरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरू नये, यासाठी महानगरपालिकेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा आणि सांडपाणी विल्हेवाटीसाठी जास्तीत जास्त ट्रॅक्टर्सची व्यवस्था करावी. हे ट्रॅक्टर्स खालून व वरून काळ्या मेणकापडाने (ताडपत्री) व्यवस्थित झाकलेले असावेत, जेणेकरून वाहतूक करताना नागरिकांना त्रास होणार नाही. तसेच परिसरानुसार गाड्यांची फ्रीक्वेन्सी वाढवून प्रशिक्षित चालकांची नियुक्ती करावी. कुठेही रक्त वाहून जाणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे व पाण्याचे चोख नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता, सलोखा आणि परस्पर सौहार्द कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here