रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ग्रामसेवकाच्या मनमानीविरुद्ध पाचोरा पंचायत समितीत तक्रार

रामेश्वर ग्रामपंचायतीचा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शेख जावीद) | पाचोरा तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवकाच्या या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर संतापलेल्या नागरिकांनी थेट पाचोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते मुकेश गांगुर्डे यांनी ग्रामस्थांच्या वतीने ही तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, संबंधित ग्रामसेवक आठवड्यातून केवळ १ ते २ दिवसच ग्रामपंचायत कार्यालयात फिरकतात. उर्वरित दिवस ते गैरहजर राहत असल्याने गावातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

ग्रामसेवक वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय दाखले, वयाचे व उत्पन्नाचे प्रमाणपत्रे मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासूनही सामान्य ग्रामस्थ वंचित राहत आहेत. एकीकडे राज्य शासन ‘गतिमान प्रशासनाचा’ आणि ‘थेट दारात सेवा’ देण्याचा दावा करत असताना, दुसरीकडे मात्र येथील ग्रामसेवक शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या तक्रारीची एक प्रत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही (CEO) पाठवण्यात आली आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास पाचोरा पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकेश गांगुर्डे व ग्रामस्थांनी दिला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here