चनकापूर धरणात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; धरण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चनकापूर

नाशिक (महाराष्ट्र राज्य संपादक खुशाल देवरे) । कळवण जवळील प्रसिद्ध चनकापूर धरण परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात पोहताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धनंजय नितीन महाले (वय १८, रा. संभाजी नगर, कळवण) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चनकापूर धरण परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने चनकापूर धरण आणि सापुतारा परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी (दि. १७) दुपारी कळवण येथील काही तरुण चनकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. या दरम्यान धनंजय महाले हा तरुण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बेपत्ता झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रविवारी दुपारी तीन वाजेपासूनच स्थानिक तरुणांच्या मदतीने धरणात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत धनंजयचा काहीही पत्ता लागू शकला नाही. रात्री अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते, तरीही प्रशासनाकडून तातडीने ‘रेस्क्यू टीम’ (आपत्ती व्यवस्थापन पथक) पाचारण करण्यात आली असून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

या घटनेमुळे जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चनकापूर धरणाच्या उत्तर बाजूला असलेल्या गंगापूर गावाकडून पर्यटक थेट दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन धरण क्षेत्रात प्रवेश करतात. या भागात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वाळू उपसा होत असल्याने पाण्यात अवाढव्य आणि खोल खड्डे तयार झाले आहेत. पर्यटकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि ते थेट मृत्यूच्या जाळ्यात ओढले जातात.

धरण परिसरात पर्यटकांचा ओघ पाहता प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करून तिथे चोवीस तास शासकीय चौकीदार नेमण्यात यावेत., संपूर्ण परिसरात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात यावेत., आपत्कालीन परिस्थितीसाठी धरण परिसरात कायमस्वरूपी जीवरक्षक तैनात करावेत., गंगापूर बाजूकडून येणारे अनधिकृत रस्ते बंद करून तिथे तात्काळ सूचना फलक लावण्यात यावेत, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने आतातरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

चनकापूर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here