एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; ३ लाखांचे ट्रॅक्टर जप्त

ट्रॅक्टर चोरणारी टोळी

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | एरंडोल परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे. एलसीबीच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करत दोन संशयितांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांमधील तब्बल ३,२५,००० रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा (नाबालिग) समावेश आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि.क्र. ४४/२०२६ आणि गु.रजि.क्र. ८४/२०२६ नुसार लागोपाठ ट्रॅक्टर चोरीचे दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले.

एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या खास गोपनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विखरण (ता. एरंडोल) येथील संशयित आरोपी विकी देवरे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांची कौशल्यपूर्वक चौकशी केली असता, त्यांनी आपले अन्य दोन साथीदार गणेश भिकन गोसावी आणि प्रवीण भाईदास कोळी (दोन्ही रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्या मदतीने हे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी या कारवाईत संशयितांकडून चोरीला गेलेले दोन्ही ट्रॅक्टर (एकूण किंमत रु. ३,२५,०००/-) जप्त केले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयितांना अटक करण्यात आली असून, फरार झालेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस पथकामार्फत कसून शोध सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पीएसआय जितेंद्र वल्टे, हवालदार संदीप रमेश पाटील (HC 2707), प्रवीण जनार्दन मांडोळे, हरीलाल लक्ष्मण पाटील, राहुल नथू कोळी, संदीप रमेश पाटील (HC 3375), महेश मुरलीधर पाटील, सागर गुलाब पाटील, भूषण जगदीश शेलार आणि चालक पोलीस शिपाई बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलातून पथकाचे कौतुक होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here