दौंड (तालुका क्राइम रिपोर्टर विकास साळुंके) | महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित दौंड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘बोरमलनाथ मंदिर’ येथे भव्य नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंतांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या रणजीत कासदेव (मुंबई पोलीस दल), श्रीमती ज्ञानेश्वरी जाधव (मुंबई पोलीस दल), ॲड. गौरी काळे (एलएल.बी. पदवी संपादन केल्याबद्दल), गणेश काळे या सर्व मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
हा भव्य नागरी सत्कार समारंभ अभिषेक थोरात आणि ‘समाज योद्धा’ भारत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला दौंड तालुक्यातील नाभिक समाजबांधवांनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सत्कारमूर्तींचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि मोलाच्या योगदानामुळे सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला.
याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष व मान्यवरांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करत समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. “समाजातील तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन पोलीस दल, विधी, प्रशासन आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करावी आणि समाजाची प्रगती साधत देशाच्या विकासात योगदान द्यावे,” असे आवाहन यावेळी उपस्थित वक्त्यांनी केले.







