जळगाव (संपादक सुनिल पाटील) | जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक काँग्रेस भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन करताना, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ‘विलासराव’ हे एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि वजनदार व्यक्तिमत्त्व होते. २६ मे १९४५ रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे जन्मलेल्या विलासरावजींनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सरपंचपदापासून केली होती. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. त्यांनी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली. विलासरावजी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वासाठी आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध होते. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘अजातशत्रू’ नेता म्हटले जायचे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांना नाटक, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राची प्रचंड आवड होती. कलावंतांना राजाश्रय मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. “विलासरावजींच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्यामभाऊ तायडे, माजी सरचिटणीस श्रीधर चौधरी, विजय वाणी, मुक्तदिर देशमुख, ॲड. अंकुश कटारे, नितीन सूर्यवंशी, प्रदीप सोनवणे, जगदीश गाडे, एरंडोल युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, राहुल भालेराव, भगवान रणदिवे, रामभाऊ चौधरी, मालोजी पाटील आणि जाकीर शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







