मुंबई (संपादक सुनिल पाटील) | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ४ मोठे आणि जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्यासह कोकणातील रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर सरकारने पूर्ण केली आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्याच्या प्रस्तावास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा असे ठरविण्यात आले.
राज्यातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सन २०२६ मधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासाठीचा कायदा, २००५’ या कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार असून, प्रशासकीय कामकाज सुरळीत व पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होणार आहे.
नवीन नागपूर आणि बाह्य वळण (बायपास) रस्त्याच्या निर्मितीसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या खाजगी जमिनींच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (मौजे सागाव सोनारपाडा) ‘पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट’ला देवस्थानच्या कार्यासाठी चार एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयामुळे या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.






