नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील लाखो तहानलेल्या नागरिकांची तहान भागवून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वाकांक्षी ‘नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प’ आता प्रत्यक्षात साकार होत आहे. महाराष्ट्र शासनाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ₹ ७,४६५.२९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी ₹ ४,११६ कोटी खर्चाचे कार्यारंभ आदेश (Work Order) ११ मे २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले असून, मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील वडेल व तळवाडे येथे या प्रकल्पांतर्गत विविध कामांची संयुक्त पाहणी मोहीम राबविण्यात आली.
या महत्त्वाकांक्षी जलप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नार, पार आणि औरंगा खोऱ्यातील अतिरिक्त १०,६४० दशलक्ष घनफूट (म्हणजेच १०.६४ टीएमसी) पाणी गिरणा खोऱ्यात वळवले जाणार आहे. यामुळे मालेगावसह संपूर्ण कसमादे (कलवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्टी, सुरगाणा आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा सिंचन लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढून शेती उत्पादनात मोठी वाढ होईल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
मालेगाव तालुक्यातील कायम दुष्काळी आणि आवर्षणप्रवण असलेल्या माळमाथा भागासाठी स्वतंत्र सिंचन व पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, यासाठी ₹४५० कोटींची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे ६७ गावांना थेट आणि अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेत खालील प्रमुख कामांचा समावेश आहे: १) गिरणा डावा कालवा: क्षमता १७९ क्युसेक्सवरून ३४५ क्युसेक्सपर्यंत वाढविणे व वितरण व्यवस्थेची दुरुस्ती (० ते २९,२०० मीटर). २) गिरणा उजवा कालवा: वहन क्षमता २२१ क्युसेक्सवरून ३३९ क्युसेक्सपर्यंत वाढविणे (० ते ३५,००८ किमी). ३) अजंग उपसा योजना: गिरणा डाव्या कालव्यावरून अजंग लघु पाटबंधारे योजनेपर्यंत ३ किमी अंतरावर उपसा सिंचनाने पाणी पोहोचविणे. ४) मोसम नदी पुनर्भरण: अजंग योजनेतून मोसम नदीवरील नऊ गाव पाणीपुरवठा योजनेच्या के.टी. वेअरपर्यंत ७.५ किमी अंतरावर पाणी पोहोचविणे. ५) वडेल बंधारा जोडणी: अजंग योजनेतून बंदिस्त नलिकेद्वारे (गुरुत्वीय पद्धतीने) ४ किमी अंतरावरील वडेल बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करणे. ६) वळवाडी उपसा योजना: मोसम नदी पात्रातून मौजे वळवाडी गावासाठी ५.५ किमी अंतरावर पाणी पोहोचविणे. ७) ६७ गावांना जलसुरक्षा: वळवाडी बंधाऱ्यापासून खाकुर्डी, कंक्राळे, कुकाणे, करंजगव्हाण, हताणे, टोकडे व जळकू या गावांपर्यंत १३ किमीची बंदिस्त नलिका टाकणे. तसेच विराणे पाझर तलावामार्गे बोरी नदीतून माळमाथा धरण (लुल्ले डॅम), अस्ताणे, झोडगे, घाणेगाव व कौळाणेपर्यंत पाणी पोहोचविणे. ८) मोसम राईस कालवा: वडेल बंधाऱ्यापासून निघणाऱ्या या कालव्याची वहन क्षमता २२० क्युसेक्सने वाढविणे (० ते १५,२०० मीटर).
“नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचनापुरता मर्यादित नसून तो उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा नवा पाया ठरणार आहे. शेती, उद्योग, रोजगारनिर्मिती आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षेची हमी देणारे हे एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचे पाऊल आहे.”
— ना. दादाजी भुसे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
मालेगाव तालुक्यातील गिरणा डावा-उजवा कालवा आणि मोसमसाळ कालवा यांच्या क्षमतावाढीच्या ₹६७ कोटींच्या कामांना २७ मार्च २०२६ रोजीच कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, प्रत्यक्ष कामाला गती आली आहे. मंत्री दादाजी भुसे यांनी मोसमसाळ कालवा व गिरणा डाव्या कालव्याच्या ५०० मीटर लांबीतील ‘पथदर्शी कालव्याची’ (Pilot Canal) प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जमिनी उपळणाऱ्या व सायफन स्ट्रक्चरच्या ठिकाणांव्यतिरिक्त इतरत्र कालव्याचे अस्तरीकरण (Lining) केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नार-पार-गिरणा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातून उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त २०.६६ टीएमसी पाण्यातून ‘चणकापूर धरण डावा कालवा’ प्रस्तावित आहे. या कालव्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून स्वयंस्पष्ट आणि तातडीने अभिप्राय सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुमारे ७२ किमी लांबीच्या या प्रस्तावित कालव्यामुळे कलवण, सटाणा आणि मालेगाव तालुक्यातील तब्बल ३,०६,२८० एकर क्षेत्राला सिंचनाचा थेट लाभ मिळणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.







