पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

पिंपरी-चिंचवड महापालिका

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाई, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील नालेसफाई, अतिक्रमण निर्मूलन, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, वृक्षारोपण, आषाढी वारी पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात एक उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांच्यासह सर्व महत्त्वाचे विभागाध्यक्ष आणि क्षेत्रीय अधिकारी (काही ऑनलाईन पद्धतीने) उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत, तेथील नाल्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. केवळ काम पूर्ण झाल्याचे न पाहता कामाची गुणवत्ता, नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
शहरातील फूटपाथ, मोकळ्या जागा आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर नियमित कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एकदा अतिक्रमण हटवल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. तसेच शहरातील फेरीवाल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘हॉकर्स झोन’ निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, जेणेकरून शहरातील मुख्य रस्ते आणि चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल.
महापालिकेच्या वतीने शहरासाठी स्वतंत्र ‘टॉयलेट पॉलिसी’ (स्वच्छतागृह धोरण) तयार करण्यात येत असून, त्यासाठी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जी स्वच्छतागृहे जीर्णावस्थेत आहेत, ती हटवून त्याठिकाणी आधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे उभारली जातील. तसेच महिलांसाठी बसविण्यात आलेल्या ‘सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स’ नियमितपणे सुरू आहेत की नाही, याची खातरजमा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कचऱ्याच्या जागांचे सुशोभीकरण: शहरात ज्या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात (Chronic Garbage Spots), अशा जागांची ओळख पटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण, हरितीकरण किंवा वृक्षारोपण करावे, जेणेकरून नागरिक तिथे कचरा टाकणार नाहीत.
पालखी मार्गावरील खड्डे बुजवा: आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व अडथळे आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत. पालखी मार्गावरील खड्डे पूर्णपणे बुजवून दिंड्यांच्या मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असेल.
संवेदनशील भागांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर: पावसाळ्यात ज्या भागात पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, अशा संवेदनशील भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यावरणपूरक वृक्षारोपण: शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये (Dividers) आकर्षक झाडे लावावीत. महापालिकेच्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा सहभाग वाढवावा. तसेच शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि परवानगीविना उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here