शहादा (विजय पाटील) – ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजाराची लाच स्विकारणार्या शहादा पंचायत समिती बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ईश्वर सखाराम पटेल याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ तक्रारदाराने तालुक्यातील होळगुजरी गृप ग्रामपंचायत टेंभलीमार्फत गावातील पेसा अंतर्गत मुतारी बांधकाम व गाव हाळ आदी कामे घेऊन ती पूर्ण केली आहेत. त्याचे एकूण बिल ६ लाख ४३ हजार झाले होते.त्यापैकी १ लाख रुपये शासनाकडून ऍॅडव्हान्स मिळाले होते. उर्वरित ५ लाख ४३ हजार रुपये येणे बाकी होते. तक्रारदारांच्या नमूद कामाच्या बिलाच्या फाइलवर पं.स. बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता ईश्वर सखाराम पटेल (वय ५४) यांची सही बाकी असल्याने बिल मंजूर होत नव्हते. तक्रारदाराने पटेल यांची भेट घेतली असता त्यांनी नमूद बिलावर सही करण्यासाठी एकूण १० हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे तक्रार केली होती. दि. ८ जून २०२० रोजी पंच व साक्षीदारांसमक्ष लाच मागणीबाबत पडताळणी केली असता आरोपी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आज दि.१७ जून २०२० रोजी ईश्वर सखाराम पटेल यांनी मागणी केल्याप्रमाणे १० हजार रुपये लाच पंच व साक्षीदारांच्या समक्ष पंचायत समिती शहादा येथील त्यांच्या बांधकाम विभागातील कार्यालयातच पंच व साक्षीदार यांच्या समक्ष स्विकरतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उप अधिक्षक शिरिष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, हेकॉ उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.






