‘त्या’ नवउद्योजकाला अखेर ‘शिवगर्जना’ने मिळवून दिला न्याय….!

सावंतवाडी (विशेष प्रतिनिधी) – काहीतरी उद्योग करण्याची धडपड… त्यासाठी पदरमोड करून, कर्ज काढून त्याने मळगाव कुंभार्ली या सावंतवाडी तालुक्यातल्या गावात ऑइल मिल प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्यासाठी मंजुरीप्रमाणे पैसेही भरले. पण मागील सात महिने वीज वितरणचे दरवाजे ठोठावूनही न्याय मिळत नव्हता. अखेर ‘शिवगर्जना’ या संघटनेकडे हा विषय पोहोचला. शिवगर्जना संघटना ही कोरोनानंतरच्या परिस्थितीत जनतेच्या बेरोजगारीच्या ज्वलंत विषयावर पोटतिडकीने व आक्रमकपणे काम करणारी संघटना आहे. त्यांच्यापर्यंत हा विषय गेला आणि त्यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंत्यालाच सात दिवसांची मुदत देऊन टाकली. तुमच्या खात्याच्या वा अधिकाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही पहा, पण पुढील सात दिवसात या नवउद्योजकाला वीज न मिळाल्यास तुम्हाला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. तापलेल्या वातावरणात अखेर पत्रकार निलेश तेंडोलकर यांनी यशस्वी मध्यस्ती केली. चर्चेत अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी या मुदतीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आणि आश्चर्यकारकरित्या पुढील चार दिवसातच त्याच्या तेल-गिरणीसाठी आवश्यक वीजपुरवठा त्याला करण्यात आला. महावितरण सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी आंदोलनाच्या इशाऱ्याचा सन्मान करत मागणीला चार दिवसात न्याय दिल्याबद्दल ‘शिवगर्जना’ संघटनेने त्या नवउद्योजक युवक व हा प्रश्न घेऊन महावितरणशी चर्चा करणारे पत्रकार निलेश तेंडोलकर यांच्यासह अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला. यावेळी शिवगर्जना संघटनेचे अध्यक्ष ऍड.प्रसाद करंदीकर, उपाध्यक्ष बाप्पा मोचेमाडकर, उपाध्यक्ष कमलेश चव्हाण, अविनाश पराडकर, चेतन नांदोसकर, पत्रकार निलेश तेंडुलकर, कोकण हेल्पलाईनचे कार्याध्यक्ष राजेश साळगावकर आदी उपस्थित होते.
ही कहाणी आहे मळगाव कुंभार्ली येथील श्री.सचिन रत्नाकर कासरलकर या तरुणाची आणि लॉकडाऊननंतरच्या बेरोजगारीत जनतेसोबत जगण्याच्या संघर्षात साथ देण्यासाठी उतरलेल्या शिवगर्जना संघटनेची देखील! समर्थ ऑइल मिल ही तेल-गिरणी सुरू करण्यासाठी सचिन कासरलकर या युवकाच्या अर्जानुसार ४ डिसेंबर २०१९ रोजी महावितरणने त्याला रीतसर वीजपुरवठा मंजूर केला गेला व त्यासाठी १५,७९७ रुपये ही रक्कम त्याने वीज वितरण कंपनीकडे भरणाही केली. मात्र मागील आठ महिने वीज वितरणचे दरवाजे ठोठाहूनही त्याला न्याय मिळत नव्हता. कर्ज काढून उभारलेली मशीनरी धूळ खात पडली होती. वृत्तपत्र माध्यमांनी हा विषय मांडला तरीही यंत्रणा हलत नव्हती. उलट आता त्याला कनेक्शन नामंजूर करणार असल्याचे सांगितले गेले. कोकण हेल्पलाईनच्या राजेश साळगावकर यांनी हा विषय शिवगर्जना संघटनेकडे मांडला आणि त्यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना आठ दिवसात वीज पुरवठा न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला. यापूर्वी महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाच संघर्ष समितीच्या माध्यमातून भडक आंदोलने करण्याचा अनुभव आणि स्वभाव असणाऱ्या कार्यकर्त्यांचा भरणा असलेली शिवगर्जना संघटना आता काय पाऊल उचलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. पण पत्रकार निलेश तेंडुलकर यांनी यशस्वी मध्यस्ती करुन मार्ग काढला. अडचणीत आलेल्या नवउद्योजकाच्या व्यवसायाचा मार्ग मोकळा झाला आहे. गरज असेल तेथे आंदोलन करतानाच, काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कारदेखील करून शिवगर्जना संघटनेने एक वेगळा पायंडा पाडला आहे. वीजेच्या कोणत्याही पायाभूत अडचणी माझ्याकडे मांडा, मी स्वतः लक्ष देऊन त्या सोडवेन, असे अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तर ‘जगा सन्मानाने’ हे घोषवाक्य घेऊन जनतेच्या जगण्याच्या सर्व प्रश्नांसाठी शिवगर्जना संघटना काम करत आहे. अशा कोणत्याही अडचणीसाठी आम्ही सदैव मदतीसाठी जनतेसोबत उभे राहू, असे संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here