गुरुपौर्णिमा महोत्सवात भक्ती, सेवा आणि सामाजिक उपक्रमांचा रांधेनगरीत संगम

गुरुपौर्णिमा

पारनेर (तालुका प्रतिनिधी दिपक भिका वरखडे) |  गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त रांधेच्या माळवाडी येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे धार्मिक विधी, अध्यात्म, समाजसेवा आणि भक्तिभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी देवस्थान परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. या महोत्सवाला हजारो स्वामीभक्तांनी उपस्थित राहून दर्शन, सेवा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

अल्पावधीतच स्वामीभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनलेल्या या देवस्थानात रांधे गाव केंद्रस्थानी मानल्यास सुमारे १०० किलोमीटर परिसरातील भाविक नियमित दर्शनासाठी येत असतात. भाविकांची वाढती संख्या आणि त्यांच्या सेवेसाठी देवस्थानाची व्यवस्थापन समिती सातत्याने कार्यरत असून, विविध गावांतील सेवेकरी व पदाधिकारी या कार्यात सक्रिय योगदान देत आहेत.
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवस्थानाच्या व्यवस्थापन समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. वडझिरे गावचे माजी उपसरपंच किसनराव चौधरी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निस्वार्थी सेवा, प्रामाणिकपणा आणि स्वामीभक्तीमुळे परिचित असलेल्या त्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सौ. आश्विनीताई श्रीकांत वरखडे यांची महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची सेवा, त्याग आणि समर्पणाची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.गुरुपौर्णिमा
देवस्थानाचा आर्थिक कारभार पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळणारे अनिल किसन गाडगे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या नियुक्त्यांना देवस्थानाचे मुख्य सेवेकरी व संस्थापक अनिल आवारी, अध्यक्ष सुभाषराव भोसले तसेच प्रविण वराळ, विजू शिरोळे, दीपक मावळे, लहू गागरे, सचिन शेंडकर, प्रतीक कापसे, अभिषेक पाणमंद आणि सुधीर परंडवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
गुरुपौर्णिमा महोत्सवाची सुरुवात पहाटे शेकडो भाविकांच्या हस्ते अभिषेकाने झाली. त्यानंतर स्वामीपाठ पठण, भजनसेवा, सामुदायिक श्री स्वामी चरित्र पारायण, पालखी सोहळा आणि प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सायंकाळी झालेल्या भव्य महाआरतीने संपूर्ण देवस्थान परिसर भक्तिरसाने भारावून गेला. भावगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अखेरीस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम .
धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवस्थानाच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. अध्यात्मासोबत समाजसेवेची जोड देत समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणारे हे उपक्रम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी देवस्थानाचे आध्यात्मिक मार्गदर्शक ह.भ.प. अनेश महाराज यांचे भक्तिभावाने पद्यपूजन करण्यात आले. उपस्थित स्वामीभक्तांनी गुरूंचा आशीर्वाद घेत आध्यात्मिक उन्नती व समाजकल्याणाची प्रार्थना केली. यावेळी कोपर्डी येथील बबनराव सुद्रिक व सौ. रेखाताई सुद्रिक हे प्रमुख अतिथी म्हणून विशेष महाआरतीस उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध सेवेकऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाप्रसादासाठी गंगाराम पानमंद व सौ. पारुबाई पानमंद यांनी पंगत सेवेची जबाबदारी स्वीकारली. कुणाल पोखरकर यांनी देवस्थान व परिसराची आकर्षक सजावट केली. अविनाश लाळगे यांनी लाईट, मंडप व ध्वनीव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तर वैष्णव जगदाळे यांनी संपूर्ण महोत्सवाचे छायाचित्रण करून या संस्मरणीय सोहळ्याच्या आठवणी जतन केल्या.
गुरुपौर्णिमा महोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचे जतन केले नाही, तर समाजसेवा, संघटनशक्ती आणि स्वामीभक्तीचा प्रेरणादायी आदर्शही सर्वांसमोर ठेवला. हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रांधेच्या माळवाडी येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान हे परिसरातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून अधिक दृढ होत असल्याचे या महोत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here