जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत ‘सेवा धर्म’ उपक्रमांतर्गत परिवारातील निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गोलानी मार्केट, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविणसिंह पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे, डॉ.अनिता भोळे तसेच ‘सेवा धर्म’ उपक्रमाचे प्रमुख पत्रकार चंद्रशेखर नेवे,समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी,तुषार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत, समाजातील सक्षम घटकांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे अनेक निराधार व गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी शेती कामात वडिलांच्या सोबत औत धरून मदत करणाऱ्या भाग्यश्री सोनवणे,स्वच्छता दूत आनंद सपकाळे,रेणुका डाबोरे यांचा सत्कार करण्यात आला.







